सौदीचा अहवाल, नवाज शरीफ व बेगम खालिदा झिया यांची बेकायदेशीर संपत्ती

सौदीचा अहवाल, नवाज शरीफ व बेगम खालिदा झिया यांची बेकायदेशीर संपत्ती

रियाध - सौदी अरेबियामध्ये भ्रष्टाचार विरोधात तीव्र मोहीम सुरू आहे, यादरम्यान ५ परकिय प्रतिष्ठीत राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये बांगलादेशचे माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया, लेबेनॉनचे पंतप्रधान साद अल हरिरी आणि पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नावांचा समावेश आहे. विदेशातील नेत्यांनी बेकायदेशीररीत्या पैसे कमवून त्यांनी संपत्ती जमा केल्याचे सौदी अरेबियाच्या अहवालात नमूद केले आहे. इतर २ परकीय नेत्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. तर सौदी देशातील १९ जण हे भ्रष्टाचारात बरबरटलेल्याचेही तपासात म्हटले आहे. मध्य पूर्वेतील एका माध्यमाने म्हटले आहे, की काही बड्या मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून खंडणी, लाच आणि इतर मार्गांचा अवलंब करून भ्रष्टाचार केला आहे.  या अहवालात खालिदा झिया आणि त्यांच्या कुटुंबियांनी १२ बिलियन डॉलर संपत्ती गोळा केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी सौदी अरेबिया आणि कतारमध्ये शॉपिंग मॉल आणि सुसज्ज सोयी असलेल्या आलिशान इमारती खरेदी केल्या आहेत. सौदी अरेबियामध्ये ५ नोव्हेंबरला ११ राजकुमारांना भ्रष्टाचारप्रकरणात अटक करण्यात आली होती.  यापूर्वी पनामा प्रकरणात नवाज शरीफ यांचे नाव आले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेले नवाज शरीफ हे पुन्हा एकदा सौदी अरेबियाच्या अहवालामुळे गोत्यात आले आहेत.