काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार

काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार

गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्याने वेळोवेळी दात घशात घालूनही पाकिस्तानची भारताला डिवचण्याची खोड काही जात नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबाराला सुरूवात केली. सध्यादेखील हा गोळीबार सुरू असून पाकिस्तानकडून लहान आणि स्वयंचलित बंदुका आणि उखळी तोफांचा जोरदार मारा सुरू आहे. भारतीय सैन्यही पाकच्या या गोळीबाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. तर दुसरीकडे शोपियान जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला चढवण्यात आला. शोपियान पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. मात्र, सीआरपीएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला निष्प्रभ ठरवला. त्यामुळे दहशतवाद्यांना पळ काढावा लागला. यानंतर सीआरपीएफकडून या भागात दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे तीन पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.