चंद्रावर गोठलेल्या स्वरुपात पाणी; नासाचा दुजोरा

चंद्रावर गोठलेल्या स्वरुपात पाणी; नासाचा दुजोरा

चंद्रावरील ध्रुवीय क्षेत्रात असलेल्या सर्वात अंधाऱ्या आणि थंड भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याच्या वृत्ताला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. नासानं आज (मंगळवार) ही माहिती दिली आहे. चांद्रयान-१ या अंतराळ यानानं पाठवलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतानं दहा वर्षांपूर्वी या अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं होतं. 

चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात बर्फ आढळल्यानं आता आगामी मोहिमांसाठी, तसेच चंद्रावर राहण्याच्या दृष्टीनंही पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यतेचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फ इतरस्त्र विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं 'पीएनएएस' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनपर लेखातही म्हटलं आहे. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक बर्फ खंदकांजवळ आढळल्याचंही सांगण्यात येत आहे. 

बर्फ उत्तर ध्रुवावर मोठ्या प्रमाणात असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. शास्त्रज्ञांनी नासाच्या मून मिनरेलॉजी मॅपरद्वारे (एम३) मिळालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेल्या अवस्थेत पाणी उपलब्ध असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. इस्रोनं २००८मध्ये प्रक्षेपित केलल्या चांद्रयान-१ या अंतराळ यानासोबत एम३ पाठवले होते. याच एम३द्वारे शास्त्रज्ञांना ही माहिती प्राप्त झाली आहे.