पाकिस्तानात रेल्वे अपघात २० ठार, ५० जखमी

पाकिस्तानात रेल्वे अपघात २० ठार, ५० जखमी

कराचीत गुरुवारी दोन रेल्वे गाडय़ांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान २० प्रवासी ठार झाले, तर ५० जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांत झालेली दुसरी मोठी रेल्वे दुर्घटना आहे.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला लांधी परिसरातील गद्दाफी शहराजवळ ही दुर्घटना घडली. फरीद एक्स्प्रेस कराचीतील स्थानकात जाण्यासाठी सिग्नलच्या प्रतीक्षेत थांबलेली असताना तिच्यावर झकेरिया एक्स्प्रेस येऊन आदळली. मुलतान येथून येणाऱ्या झकेरिया एक्स्प्रेसला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे सिग्नल दिल्याने ही दुर्घटना घडली, असे सिंधच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सईद घनी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.या दोन्ही गाडय़ांमध्ये एकूण किती प्रवासी होते त्याची रेल्वे अधिकारी शहानिशा करीत आहेत, जवळपास एक हजार प्रवासी असावेत असा अंदाज आहे, असे घनी यांनी सांगितले. या दुर्घटनेत फरीद एक्स्प्रेसचे दोन, तर झकेरिया एक्स्प्रेसच्या एका डब्याचा पूर्ण चक्काचूर झाला. प्रवाशांचे सामान इतस्तत: पडलेले दिसत होते आणि मदतकार्य पथकातील कर्मचारी डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सोडविण्याच्या प्रयत्नात होते, असे टीव्हीच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते.संपूर्ण चक्काचूर झालेले डबे आणि रेल्वेमार्ग मोकळा करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आणि अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली.

डबे कापण्यासाठी इलेक्ट्रिक कटरचा वापर करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या दुर्घटनेमुळे रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी झाली होती आणि जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका रस्त्यातच अडकल्या होत्या. मदतकार्य पूर्ण होईपर्यंत कराचीहून जाणाऱ्या सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. ही मोठी दुर्घटना असल्याने रेल्वे वाहतूक सुरू होण्यास वेळ लागेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
फरीद एक्स्प्रेस लाहोरहून कराचीला येत होती, तर झकेरिया एक्स्प्रेस मुलतानहून येत होती. झकेरिया एक्स्प्रेसने फरीद एक्स्प्रेसला पाठीमागून इतकी जोरदार धडक दिली की त्यामध्ये तीन डबे उलटले आणि दोन्ही गाडय़ांचे नुकसान झाले, असे ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले.