मदुराईच्या प्रसिद्ध मिनाक्षी मंदिराला नक्कीच द्या भेट

मदुराईच्या प्रसिद्ध मिनाक्षी मंदिराला नक्कीच द्या भेट

तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. येथील हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडे ही पाहण्यासारखीच आहेत. या मदुराईतच प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्यकारभार पाहण्यासाठी पाठविले. त्याच्याबरोबर सेनापती आर्यनायक मुठली हा सुद्धा गेला. नायक वंशात तिरुमलाई नायक हा सर्वांत पराक्रमी होता. त्याने १६५९ पर्यंत राज्य केले. त्याच्याच काळात मदुराईत भव्य इमारती बांधल्या गेल्या.

मिनाक्षी मंदिराचे सध्याचे स्वरुप हे कुणा एका राजामुळे आलेले नाही, तर अनेक राजांचा यात सहभाग आहे. मंदिराचे आवार भव्य आहे. २४० मीटर लांब व २६० मीटर रुंद असा हा परिसर आहे. 

या आवारात अनेक छोटी, मोठी मंदिरे आहेत. येथेच एका बाजूला श्यामवर्ण मिनाक्षीदेवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. तिच्या आजूबाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जवळच सोन्याचा मुलामा दिलेला स्तंभ आहे. उत्तरेला सुंदरेश्वर मंदिरेचा गोपूर आहे.

मंदिरच्या चारीही बाजूला गोपूर असून त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहेत. कुंबथडी मंडपममध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषीमुनींच्या प्रतिमा आहेत. 

मिनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मिनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरात स्नान घातले जाते.

अलगार मंदिर

मदुराईपासून १८ किलोमीटरवर मिनाक्षीदेवीचा भाऊ अलगार याचे मंदिर आहे. त्याच्यासंदर्भातही एक दंतकथा सांगितली जाते. मिनाक्षीदेवीच्या लग्नाला अलगार निघाला होता. मात्र, नगरात पाऊल ठेवण्याआधीच त्याला लग्न झाल्याचे कळले. तो आल्यापावली परत गेला. चैत्रात मिनाक्षीदेवी व सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा होतो. विवाहनंतर वेगा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही प्रतिमा आणल्या जातात. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर अलगाराची प्रतिमा आणली जाते नंतर ती परत नेली जाते.