इजिप्त एअरच्या विमानाचा अपघात, सर्च ऑपरेशन सुरु

इजिप्त एअरच्या विमानाचा अपघात, सर्च ऑपरेशन सुरु

कैरो, दि. 19 - इजिप्त एअरच्या 66 प्रवाशांना घेऊन जाणा-या MS804 विमानाचा अपघात झाल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली आहे. या विमानाचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरु आहे. पॅरिसहून कैरोला निघालेलं हे विमान अचानक रडारवरुन गायब झालं होतं. स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 2.45 वाजता विमान रडारवरुन गायब झाले होते. पण इतका वेळ होऊनही विमानाने जवळच्या कोणत्याच विमानतळावर लँडींग केलं नसल्याने विमानाचा अपघात झाली असल्याची शक्यता इजिप्त एअरच्या अधिक-यांनी दर्शवली आहे. इजिप्तचे पंतप्रधान स्वत: इजिप्त एअरच्या आपत्कालीन विभागात हजर राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
 
इजिप्त एअरचं विमान अचानक रडारवरुन गायब झालं होतं. पॅरिसहून कैरोला जाणा-या या विमानात 56 प्रवासी आणि 10 क्रू मेम्बर्स होते. एअरबस A320 जमिनीपासून 37 हजार फुटांवर उडत असताना स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 2.45 वाजता विमान रडारवरुन गायब झाले.
 
विमानाने 11 वाजून 9 मिनिटांनी चार्ल्स द गॉल येथून उड्डाण केले होते अशी माहिती इजिप्त एअरने दिली आहे.  मात्र काही वेळातच हे विमान रडारवरून गायब झाले. कंट्रोल रूमशी कोणताही संपर्क होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इजिप्त‍च्या आसपासच्या भागावर इसीस या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे विमानाला दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.इजिप्तचं लष्करी विमान सर्च ऑपरेशन करत आहे. विमानात असलेल्या 66 प्रवाशांमध्ये 10 क्रू मेंम्बर्स असून एक लहान मुलगा, 2 बाळ आहेत. प्रवाशांमध्ये 15 फ्रेंच, 30 इजिप्त तसंच ब्रिटन, इराकी, कुवैत,  सौदी, पोर्तुगीज, बेल्जिअम, अल्जेरिअनचे नागरिक आहेत.
इजिप्त एअर विमानाचं अपहरणनाट्य -
29 मार्चला इजिप्त एअर विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणा-या व्यक्तीने स्फोटकांचा बेल्ट बांधला असून उडवून देण्याची धमकी देत विमानाचं एमर्जन्सी लॅडींग करण्यास सांगितलं होतं. सैफ अल दिन मुस्तफा या व्यक्तीने हे अपहरण केलं होतं. पोलिसांनी त्याला नंतर अटक केली होती.