भारतीय वंशाचे अॅटर्नी प्रीत भरारा यांच्याकडे ट्रम्प शासनाने मागितला राजीनामा

भारतीय वंशाचे अॅटर्नी प्रीत भरारा यांच्याकडे ट्रम्प शासनाने मागितला राजीनामा

भारतीय वंशाचे अमेरिकन अॅटर्नी प्रीत भरारा यांनी राजीनामा द्यावा अशी सूचना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने केली आहे. प्रीत भरारा यांची नियुक्ती बराक ओबामा यांच्या काळात झाली होती. प्रीत भरारा यांच्या बरोबरच इतर ४५ अॅटर्नींनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. अमेरिकेमध्ये एकूण ९३ अॅटर्नी आहेत. त्या पैकी बहुतांश जणांनी आपल्या पदाचा आधीच राजीनामा दिला असून सध्या ४६ जण त्या पदावर आहेत. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत विचारणा झाली आहे. प्रशासनात एकसूत्रता व्हावी या कारणासाठी या ४६ जणांनी आपले राजीनामे द्यावे असे न्याय विभागाच्या प्रवक्त्या साराह इसगूर फ्लोरेस यांनी म्हटले होते. या आधी जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी देखील या प्रकारची सूचना दिली होती असे साराह म्हणाल्या. 

या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या नियोजनामुळे निर्णयांची अंमलबजावणी करता येईल असे त्या म्हणाल्या.  २००९ मध्ये प्रीत भरारा यांची दक्षिण न्यूयॉर्कचे अॅटर्नी म्हणून बराक ओबामांनी नियुक्ती केली होती. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर भरारा यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपल्या पदाचा त्याग करू नये असे ट्रम्प यांनी भरारा यांना म्हटले होते आणि आता त्यांच्याच प्रशासनाने राजीनामा देण्याची सूचना दिल्यामुळे सर्वजण चकित झाले आहे. भरारा यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये अमेरिकन सरकारचे न्यायालयात प्रतिनिधित्व केले आहे.