आदर्श शिंदेनं गायलं ‘विठूमाऊली’चं शीर्षक गीत

आदर्श शिंदेनं गायलं ‘विठूमाऊली’चं शीर्षक गीत

मुंबई : आपल्या दमदार आवाजानं अवघ्या महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या आदर्श शिंदेनं स्टार प्रवाहच्या 'विठूमाऊली' या नव्या मालिकेचं शीर्षक गीत गायलं आहे. ही मालिका ३० ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता पाहता येणार असून, या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता या गाण्यानं तिन्हीसांजेला महाराष्ट्राच्या घराघरात विठूमाऊली अवतरणार आहेत.
 
मराठी संगीतात आदर्श शिंदे हे महत्त्वाचं नाव आहे. आदर्शनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांसाठी हिट गाणी गायली आहेत. महाराष्ट्रात त्याचा मोठा फॅन क्लब आहे. आदर्शने अलीकडेच स्टार प्रवाहच्याच 'गोठ' या मालिकेचंही शीर्षक गीत गायलं होतं जे लोकप्रिय ठरलं. अक्षयराजे शिंदे या नव्या गीतकारानं हे शीर्षक गीत लिहिलं आहे. तर गुलराज सिंह यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गुलराज सिंह यांनी बरीच वर्षं ऑस्कर विजेत्या ए. आर. रहमान आणि शंकर एहसान लॉय यांच्यासारख्या दिग्गजांसाठी कीबोर्ड वाजवले आणि संगीत निर्मिती केली आहे. विठूमाऊलीच्या शीर्षक गीताद्वारे त्यांनी मराठी टेलिविझनवर पदार्पण केलं आहे.