‘फाटक्या’ जीन्सवरील बंदीला विरोध

‘फाटक्या’ जीन्सवरील बंदीला विरोध

आधुनिक पेहरावामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सीएसटी परिसरातील सेंट झेवियर्स महाविद्यालयात आता पेहरावावरील र्निबधांमुळे वादंग निर्माण होऊ लागले आहे. स्लीव्हलेस टॉप, शॉर्ट्स यांपाठोपाठ फाटलेल्या जीन्स (रिप्ड) या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना मज्जाव केला आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. ‘रिप्ड’ जीन्सचा फॅशन प्रकार फाटके कपडे घालण्याची वेळ येणाऱ्या गरिबांची खिल्ली उडविणारा आहे. तर आम्ही काय घालावे किंवा काय घालू नये हे ठरविण्याच्या आमच्या स्वातंत्र्यावरच हा निर्णय गदा आणत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.सिनेमा-मालिकांमधील फॅशनचे ट्रेण्ड महाविद्यालयांमध्ये लगेगच उचलले जातात.

सध्या प्रचलित असलेला ‘रिप्ड’ म्हणजे ठिकठिकाणी फाटलेल्या जीन्सचा प्रकार तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. परंतु या फाटक्या जीन्स घालण्याला सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांवर बंदी आणली आहे. या आधी महाविद्यालयाने शॉर्ट्स आणि स्लीव्हलेस टॉप घालण्यावरही बंदी आणली होती. परंतु आता ‘रिप्ड’ जीन्सवरही बंदी आणल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. शरीरप्रदर्शन न करणाऱ्या रिप्ड जीन्स घालण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न काही विद्यार्थी करीत आहेत. अशा जीन्स घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हटकले जाते आणि कपडे बदलूनच महाविद्यालयात येण्यास सांगितले जाते.