महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात तिसरे

महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात तिसरे

पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणारा महाराष्ट्र हा महिला अत्याचारामध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. देशात उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये ९४ टक्के आरोपी हे जवळचे नातेवाइक, शेजारी, परिचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील महिला जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरोने देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा गुन्हेगारी २०१६चा नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी देशात महिला अत्याचाराच्या एकूण तीन लाख ३८ हजार ९५४ घटना घडल्या आहेत. २०१५ तुलनेत २०१६ मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्ह्यांत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. विनयभंग व छेडछाडीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य पहिले, अपहरणाच्या गुन्ह्यात दुसरे आणि बलात्काराच्या गुन्ह्यात तिसरे असल्याचे समोर आले आहे.