शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर

शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर

शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळेच राज्यातील मेट्रो व अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ७६ हजार ५२३ कोटी  रुपये उपलब्ध करुन  दिल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकैय्या नायडू यांनी मंगळवारी येथे दिली.
सह्य़ाद्री अतिथीगृहात आज नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राला ६७ हजार कोटी रुपये विविध प्रकल्पांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी २० हजार १०० कोटी, सात स्मार्ट शहरांकरिता १९ हजार १०० कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १३ हजार ५६४ कोटी, अमृत योजनेसाठी सात हजार ७५९ कोटी , स्वच्छ भारत योजनेसाठी सात हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आल्याचे नायडू यांनी सांगितले.