१ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन

 १ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन

'येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर न केल्यास संपूर्ण राज्यात १ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल', असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत आरक्षणावर तोडगा निघणार असल्याचं सांगणाऱ्या राज्य सरकारची डिसेंबरमध्ये कसोटी लागण्याची शक्यता आहे. 

आरक्षणासाठी मराठा तरुणांनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. 'महाराष्ट्र बंद', 'मुंबई बंद' पुकारत हिंसक आंदोलनेही झाली. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलत आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोग नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच निर्णय घेता येईल, असं सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मराठा आंदोलन थंडावलं. मात्र हे आंदोलन थंडावल्याचं वरवर दिसत असलं तरी मराठा तरुणांमधील अस्वस्थता अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चानं बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी मराठा समाजाच्यावतीनं विविध मागण्या मांडण्यात आल्या. मराठा तरुणांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मराठा समाजाकडून हेल्पलाइन तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात टीका करण्यात आली. सरकारने अद्यापही मराठा तरुणांना कर्जाचे वाटप केलेले नाही, असं सांगतानाच महिन्याभरात हे कर्ज वाटप झालं पाहिजे, अशी मागणी मराठा तरुणांनी केली आहे. सरकारने दिलेल्या सर्व आश्वासनांचं पालन करावं, अन्यथा संबंधित विभागांना टाळं ठोकण्यात येईल, असा इशारा मराठा मोर्चानं दिला आहे. या आंदोलनामध्ये अनेक तरुणांवर नाहक गुन्हे दाखल झाले आहेत, पोलिसांनी तरुणांची धरपकड थांबवावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.