सिद्धिविनायक मंदिराकडून केरळला एक कोटी

सिद्धिविनायक मंदिराकडून केरळला एक कोटी

केरळमधील पूरग्रस्तांसाठी संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू असतानाच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानेही केरळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सिद्धिविनायक मंदिराने केरळ पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत जाहीर केली आहे. 

केरळ पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री (केरळ पूर) सहाय्यता निधी' स्थापन केला आहे. या सहाय्यता निधीत एक कोटीचा निधी देण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. राज्यशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हा निधी सहाय्यता निधीत वर्ग करण्यात येणार असल्याचं व्यवस्थापन समितीने स्पष्ट केलं. 

सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने यापूर्वीही नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केलेला आहे. २००५ मध्ये रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी सिद्धिविनायक मंदिराने ५ कोटी रुपये दिले होते. पुण्यात माळीन येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. त्यावेळी माळीन गावाच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपये देण्यात आले होते. तर २०१३ मध्ये दुष्काळाच्या निवारण्यासाठी मंदिराकडून २५ कोटी रुपये देण्यात आले होते.