खासदार बारणेंनी ‘रेड झोन’ प्रश्नासंबंधी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

खासदार बारणेंनी ‘रेड झोन’ प्रश्नासंबंधी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

पुणे - मावळ लोकसभा मतदार संघामध्ये संरक्षण विषयी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये रेड झोन, बोपखेल येथील संरक्षण विभागाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याबाबत, मावळ येथील मिसाईल प्रकल्प व उरण येथील नेव्ही सेन्सिटिव्ह झोन, असे अनेक प्रश्न रखडलेत. या संदर्भात खासदार बारणे यांनी संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांची दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.

यासंदर्भात खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड शहरातील रेडझोनची हद्द कमी करण्याबाबत अनेक वेळा संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा या प्रश्नांबाबत करत आहे. बुधवारी संरक्षणमंत्र्यांची भेट घेवून या प्रश्नांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देऊन तत्कालीन संरक्षण मंत्री व मनोहर पर्रीकरांच्या बरोबर झालेल्या बैठकीचा वृत्तांतही दिला. तसेच बोपखेल पुलाच्या प्रश्नाबाबत काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालायाने संरक्षण खात्याच्या जागेतून रस्ता करण्यास मान्यता देऊ नये, असा निकाल एका याचिकेच्या दरम्यान दिला असल्याने हा प्रश्न अधिक जटील झाला आहे.