‘शोध मराठी मनाचा’ जानेवारीमध्ये पुण्यात

‘शोध मराठी मनाचा’ जानेवारीमध्ये पुण्यात

जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात येणारे 'शोध मराठी मनाचा' हे १५ वे जागतिक संमेलन शहरात होणार आहे. यंदाच्या या संमेलनाचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलिया येथील अभियंते आणि ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविलेले डॉ. विजय जोशी भूषविणार आहेत. डॉ. विजय जोशी यांनी निर्माण केलेले रस्ते विकासाचे तंत्रज्ञान जगभरात अतिशय मोलाचे मानले जाते. उद्योग क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण करून सुमारे ७० हजार जणांना रोजगार देणारे भारत विकास ग्रुप अर्थात बी.व्ही.जी.चे संस्थापक-अध्यक्ष हणमंतराव गायकवाड हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. जगभरात विखुरलेल्या आणि उद्योग, व्यवसाय, विज्ञान, स्थापत्य, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तींना 'शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनाच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.