नागपूरला पळवल्या ‘शिवशाही’ बस

नागपूरला पळवल्या ‘शिवशाही’ बस

नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक डेपोमध्ये दाखल झालेल्या चार शिवशाही बस तातडीने नागपूर डेपोकडे देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या वाटेला आलेल्या चार बस पहिल्याच दिवसाच्या सेवेनंतर नागपूरला रवाना होणार आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील ११ हिरकणींपैकी चार बसेस कमी करून त्याऐवजी शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला. नाशिक डेपोकडे चार नव्या बस रविवारीच दाखल झाल्या. या चार बसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा देण्यात आली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता, दुपारी १२.१५, दुपारी १.१५ आणि दुपारी २.१५ वाजता या बस नाशिकहून पुण्याकडे निघाला. या चारही बसेसला भरघोस प्रतिसाद लाभला. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बसच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. शिवनेरी बसचे भाडे नाशिक-पुणेसाठी ६०५ रुपये आहे, तर सेमी लक्झरीचे भाडे ३१६ रुपये आहे. त्यामुळे ही बस परवडणारी असल्याचे प्रवाशांचे मत आहे. नाशिक डेपोकडील चार आणि पुणे डेपोकडील चार अशा एकूण आठ शिवशाही बसेसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा देण्यात आली. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने २० बसेस मिळणार असून, त्यात स्ल‌िपर कोचसुद्धा असणार आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी महामंडळाचा अजब फतवा आला आहे. नाशिक आणि पुणे डेपोकडील नव्याने दाखल झालेल्या प्रत्येकी चार बसेस तातडीने नागपूरला देण्यात याव्यात, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे अवघ्या एक दिवसाच्या सेवेनंतर या बसेस नागपूरला रवाना होणार आहेत. परिणामी, शिवशाही बसच्या सेवेपासून नाशिककर वंचित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.