१५ ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन

१५ ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन

आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर आता येत्या १५ ऑगस्टपासून चूलबंद करून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा मराठा समन्वय समितीने आज केली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीने ही घोषणा केली. 

मूक मोर्चा, ठोक मोर्चा, ठिय्या आंदोलन आणि महाराष्ट्र बंदनंतर आता मराठा समन्वय समितीने रस्त्यावरील आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत तालुका स्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचंही समितीने जाहीर केलं. काल झालेल्या महाराष्ट्र बंदमध्ये बाह्यशक्ती घुसल्यामुळेच तोडफोड झाली. त्याचा मराठा आंदोलकांशी काहीही संबंध नसल्याचा दावाही समितीने केला. दरम्यान, महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसेचा निषेध करतानाच नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल समितीने दिलगिरी व्यक्त केली आहे. 

बंदवेळी तोडफोड करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना मदत करू, असं सांगतानाच कार्पोरेट कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून या कंपन्यांमध्ये तोडफोड करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.