‘मुख्यमंत्र्यांमुळेच घडला चमत्कार, नारायण राणे यांचे ‘विशेष’ आभार’

‘मुख्यमंत्र्यांमुळेच घडला चमत्कार, नारायण राणे यांचे ‘विशेष’ आभार’

मुंबई - नारायण राणे यांनी राजिनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक झाली. यात भाजपचे प्रसाद लाड यांचा दणदणित विजय झाला आहे. त्यांना २०९ मते मिळाली आहेत. यावर पत्रकारांबरोबर संवाद साधताना लाड यांनी सुचक प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी मला मदत केली, यासाठी त्यांचे विशेष आभार, असे म्हणायलाही ते विसरले नाही. लाड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा चमत्कार आहे. त्यांच्या मुळेच मला २०९ मते मिळाली. विरोधकांची  जवळ जवळ १२ मते फुटली आहेत. त्यांचेही आभार मानतो. विशेषतः नारायण राणे यांनीही या निवडणुकीत मला मदत केली, असे सांगत, त्यांचेही आभार, असेही लाड म्हणाले. या निवडणुकीत दिलीप माने यांना ७५ मते मिळाली आहेत.तत्पूर्वी, मतदानासंदर्भात बोलताना 'माझे नेते नारायण राणे आहेत. त्यामुळे माझे मत कुणाला हे जगजाहीर आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निवडणूक लढवली नाही. पण जर निवडणूक लढवली असती तर आमच्याकडे ३१ मते अतिरिक्त होती. राणे यांनी या निवडणुकीत अनेकांना उघडे पाडले असते. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून माझ्यावर कारवाई करण्याची हिम्मत 'आदर्श' विरोधीपक्ष नेते करणार नाहीत, असे नितेश राणे म्हणाले होते.  नितेश राणे यांच्या या विधानावर विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी, 'पक्षाच्या विरोधात ज्यांनी मतदान केले त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई पक्ष करेलच. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर निर्णय घेऊ असे म्हटले आहे.