दीपोत्सवासाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज

दीपोत्सवासाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज

नाशिक : दिवाळी हा जसा दीपोत्सव आहे, तसा तो रंगोत्सवदेखील आहे. दिवाळीनिमित्त घर, ऑफीस रंगविण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे आता दसरा झाल्यानंतर दिवाळीसाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज झाली आहे.

घर जुने असो की नवीन असो, ते उठून दिसते ते रंगामुळे. घर रंगवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत नाही. पूर्वी कुटुंबातील सदस्य दिवाळीत घराचे रंगकाम करायचे. आता फ्लॅट सिस्टिम आली, बंगले झाले. त्यामुळे मजुरीवर रंगकाम दिले जाते. आधुनिकतेकडे झुकणाऱ्या रंगांचा वापर वाढला आहे.

अनेकांकडून घराला आतून आणि बाहेरून रंग दिला जातो. त्यासाठी वेगवेगळे रंग असतात. रॉयल, डिस्टेम्पर, ट्रॅक्टर ईमर्शन आणि प्लास्टिक हे रंग घराच्या आतील भिंतींसाठी वापरतात, तर एस, अॅपेक्स, अल्टिमा आदी रंग बाहेरून वापरतात. ऑफिससाठी आतून रॉयल, तर बाहेरून अॅपेक्स रंग दिला जातो. बंगला व घरासाठी आतून इमर्शन व बाहेरून एस किंवा अॅपेक्स वापरतात. रॉयल पेंट्स ४७० रुपये लिटर, डिस्टेम्पर ९० रुपये, प्लास्टिक 280 रुपये, तर ट्रॅक्टर इमर्शन १४० रुपये लिटर आहे. बाहेरून द्यावयाच्या पेंट्सचे दर एस १७० रुपये, अॅपेक्स २८० रुपये आणि सर्वांत महाग अल्टिमा हा ३७० रुपये लिटर आहे. नाशिकरोड येथील पेंट व्यावसायिक विद्युत पडवळ यांनी ही माहिती दिली.