सरकारशी असहकाराचा ठराव

सरकारशी असहकाराचा ठराव

नाशिक : राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजुराची व शेतीपूरक व्यावसायिकांना कोणत्याही अटी, शर्ती व निकष न लावता सन २०१७ पर्यंत संपूर्ण कर्जातून मुक्त करावे. कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत शेतीवरचे कर्ज, वीज बिल, पाणीपट्टी, शेतसारा आम्ही देणार नाहीत. तसेच, सरकारच्या वतीने होणाऱ्या कामकाज व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार किसान मंचच्या अधिवेशनात करण्यात आला. शेती व शेतकऱ्यांशी निगडीत विविध प्रकारचे नऊ ठराव किसान मंचच्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान मंचतर्फे शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानचा समारोप तथा राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत झाला. मंचाचे समन्वयक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, पकंज भुजबळ, जयवंत जाधव हे सर्व आमदार, किशोर माथनकर, दत्ता पवार, खेमराज कोर, श्रीराम शेटे, रामचंद्र बापू पाटील, रंजन ठाकरे, प्रेरमा बलकवडे, विष्णुपंत म्हैसधुणे, मंचचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनात उद्घाटन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शेतकरीहिताचे नऊ ठराव मांडले. यानंतर या ठरावावर अधिवेशनात चर्चा झाली. खेमराज कोर यांनी अभियानामागील भूमिका मांडली.