हायकोर्टाने ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवरील बंदी उठवली

हायकोर्टाने ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवरील बंदी उठवली

मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ठाण्यातील घोडबंदर आणि पुण्याच्या बालेवाडी भागातील नवीन बांधकामांवरील स्थिगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. तसेच तयार बांधकामांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट जारी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून लागू असलेली ही बंदी उठल्यामुळे घोडबंदर आणि बालेवाडी येथील आपल्या नवीन घरात लोकांना आता प्रवेश करता येणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निर्देश दिले होते. त्यानुसार पाण्याची ही समस्या पूर्णपणे सोडवल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. यासंदर्भात नवीन समिती स्थापन करुन दर दोन महिन्यांनी समितीने या भागातील विविध पाणी पुरवठा आणि नवीन बांधकाम यांच्या नियोजनाचा आढावा घेऊन अहवाल सादर करेन, असेही आदेश न्यायालयाने दिले.