मनसेकडून पालिका अधिकाऱ्यांना दिला ‘कचरा’ भेट

मनसेकडून पालिका अधिकाऱ्यांना दिला ‘कचरा’ भेट

ठाणे - दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसैनिकांनी कल्याणमधील पालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांना कचरा भेट देत, दिवाळीपूर्वी शहरात स्वच्छता न दिसल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कल्याण डोंबिवली शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. कचराप्रश्नी न्यायालयानेही महापालिका प्रशासनाला फटकारले आहे. मात्र वर्षभराचा कालावधी लोटला, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. आज सकाळीच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील विविध प्रभाग कार्यलयात जाऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट दिला. येत्या १५ दिवसात शहरात कचरा नियमितपणे न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला दिला आहे.