दाभोलकरांचा स्मृतिदिन आता ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’

दाभोलकरांचा स्मृतिदिन आता ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’

अवैज्ञानिक संकल्पनांना प्रतिष्ठा न देता समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयुष्यभर अंधश्रद्धांच्या विरोधात उभे ठाकलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन यापुढे 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, समाजात विज्ञानाची ज्योत तेवती ठेवणारे शास्त्रज्ञ, विज्ञान अभ्यासक, विज्ञानाचे विद्यार्थी आणि विविध सामाजिक चळवळींशी जोडले गेलेले कार्यकर्ते अशा सर्वांनी एकत्र येत ही घोषणा केली आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी डॉ. दाभोलकरांचा पाचवा स्मृतिदिन आहे.

शनिवारी सायंकाळी पुण्यात झालेल्या 'इंडिया मार्च फॉर सायन्स' या मोर्चामध्ये ही घोषणा एकमुखाने करण्यात आली. विज्ञानप्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार या गोष्टीचे गांभीर्य सर्वत्र पोहचावे आणि त्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी, या उद्दिष्टांसाठी देशभरात गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी 'इंडिया मार्च फॉर सायन्स'च्या माध्यमातून शास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, विज्ञान लेखक, विद्यार्थी, अनेक सामाजिक-वैज्ञानिक संघटना आणि हजारोंच्या संख्येने नागरिक एकवटले होते. त्याच धर्तीवर आज सुद्धा एक मोर्चा काढण्यात आला. यात अनेक शास्त्रज्ञांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी २० ऑगस्ट हा 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली होती, त्याच जागेवर ही घोषणा करण्यात आली.

भारतात लोकविज्ञानाच्या चळवळीसाठी कार्यरत 'ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क'ने दोन महिन्यांपूर्वी 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिना'विषयी ठराव मांडला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. यानिमित्ताने, उच्च शिक्षणात मूलभूत संशोधनाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, उच्च शिक्षणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यांसह विविध मागण्यांसाठी शास्त्रज्ञ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर (ओंकारेश्वर मंदिराजवळील पूल) हा मोर्चा निघाला होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ, डॉ. अर्णब घोष, डॉ. विनिता बाळ, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या संचालक गीता महाशब्दे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) मिलिंद देशमुख यांसह सुमारे सत्तर ते ऐंशीजण त्यात सहभागी झाले होते. येणारेजाणारे नागरिक याविषयी उत्सुकतेने चौकशी करताना पाहायला मिळाले.