आधारमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका; रीथिंक आधार अभियानाकडून भीती व्यक्त

आधारमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका; रीथिंक आधार अभियानाकडून भीती व्यक्त

मुंबई - देशातील नागरिकांना विविध योजना आणि कामांसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात येत आहे. मात्र आधार आणि त्यासाठीची संपूर्ण यंत्रणा ही सुरक्षित नाही. यातून देशातील नागरिकांच्या वैयक्तीक माहिती ही कोणत्याही विदेशी कंपन्या आणि यंत्रणांना सहज मिळू शकते. आधार सक्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती आधार सक्तीच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या रीथिंक आधार अभियानाकडून व्यक्त करण्यात आली.

आधारची सक्ती ही संविधानिक नाही आणि आधार हे नागरिकत्वाचा पुरावाही होऊ शकत नाही. परंतु केवळ राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी चालवलेली मोहीम असल्याचा आरोप यावेळी करण्यात रीथिंक आधार अभियानाच्या रघु यांनी केला.

आधारच्या माध्यमातून आज देशात विविध प्रकारच्या १३० योजना जोडण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर या योजना अडचणीत सापडल्या असून स्वस्त धान्यसारख्या योजनांना छत्तीसगड, झारखंड आदी राज्यात खीळ बसली आहे. तर दुसरीकडे आधारमुळे देशात भ्रष्टाचार वाढला असल्यामुळे याविरोधात अनेक संस्था न्यायालयात गेल्या आहेत. आधारच्या जोडणीमुळे नागरिकांची सर्व माहिती मोठ्या प्रमाणात चुकीच्या यंत्रणाकडे कशी जाऊ शकते. त्यासाठीची माहिती बायोमेट्रिक यंत्रणेतील तज्ञ जे. के. डिसुझा यांनी दिली. आधार आणताना त्यासाठी योग्य पर्यायांचा विचार करण्यात आला नाही. मात्र आता अडचणी निर्माण झाल्याने त्याविरोधात न्यायालयाने निर्णय दिल्यास ११८ कोटी जनतेचे नुकसान होईल असा दावा केला जात असून तो खोटा असल्याचे डिजिटल फ्रीडम फौंडेशनचे कृष्णकांत माने यांनी सांगितले.

आधार सक्ती आणि त्यानंतर करण्यात येत असलेल्या लिंकच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जात असून त्यासाठी देशात याविरोधात स्वाक्षरी आणि सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला देशात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे रघु यांनी सांगितले.