सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही

सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही

औरंगाबाद - चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात कोणी मज्जाव केल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजेत. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केल्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, अतिरिक्त शुल्क, खराब दर्जाचा माल किंवा योग्य सेवा मिळत नसल्यास त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले.