विदर्भात व्याघ्रपर्यटन फुल्ल

विदर्भात व्याघ्रपर्यटन फुल्ल

जंगल सफरीचे आकर्षण असणाऱ्या वन्यप्रेमींनी यंदा फेब्रुवारीपासूनच बुकिंग केल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफारी मेअखेरपर्यंत हाउसफुल्ल झाली आहे. यासोबतच पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट, बोर या व्याघ्र प्रकल्पांतील तारखाही बुक असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पर्यटकांचे 'जंगल सफारी'ला विशेष प्राधान्य दिसून आले आहे.

वन्यप्रेमी संवर्धनाविषयी होत असलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षात 'वाइल्ड लाइफ टूरिझम'मध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या संखेने व्याघ्र प्रकल्पांना भेटी देत आहेत. 'ऑनलाइन बुकिंग'मुळे उन्हाळ्याच्या सुट्यांचे नियोजन फेब्रुवारी महिन्यातच करून पर्यटकांनी एप्रिल-मे मध्ये जंगल सफरीची नोंदणी करून ठेवली आहे. एप्रिलला पर्यटकांचा प्रकल्पात उत्तम प्रतिसाद लाभला. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देशीसह आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेदेखील हातभार लावत वेगवेगळे प्रयोग केले. राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद ताडोब्यात आहे. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती व्याघ्र पर्यटनात ताडोब्यालाच असते. त्याचा प्रत्यय पुन्हा यंदाही दिसून आला आहे. आगाऊ ऑनलाइन बुकिंग करून ठेवण्यात आले आहे. यंदा प्रथमच विदर्भातील इतर पेंच, नवेगाव-नागझिरा,मेळघाट, बोर या व्याघ्र प्रकल्पांचे बहुतांश तारखांचे बुकिंगही फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यलाही यंदा पर्यटकांनी पसंती दर्शविली आहे. शनिवारपासून सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटकांची पावले व्याघ्र पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. ताडोबा वगळता राज्यातील काही व्याघ्र प्रकल्पात आणि अभयारण्यात 'निसर्गानुभव' या नावाने मचाण सेन्सस बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात होत आहे.