दागिने मोडून महिलेची जवानांना मदत

दागिने मोडून महिलेची जवानांना मदत

जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचिन येथे भारतीय जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारता यावा, यासाठी पुण्यातील शिक्षिकेने पुढाकार घेतला आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी सुमेधा योगेश चिथडे यांनी स्वत:चे दागिने मोडून सव्वा लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. लष्कराविषयी माहिती देणाऱ्या व्याख्यानांच्या माध्यमातून त्या उर्वरित निधी उभारणार आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक सामान्य नागरिक काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण सुमेधा यांनी ठेवले आहे. 

'सियाचिन ही जगातील सर्वांत उंच युद्धभूमी आहे. आपण सहजपणे श्वास घेतो. मात्र, सियाचिनला श्वास घेता येणे हीदेखील चैनीची बाब म्हणावी लागेल. सियाचिन येथे वर्षभरात साधारणत: आठ हजार जवान तैनात असतात. त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी लष्करातर्फे ऑक्सिजन तयार करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही 'सिर्फ'च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतला,' असे सुमेधा यांनी सांगितले. 

या प्रकल्पासाठी एक कोटीहून अधिक रक्कम खर्ची पडणार आहे. ही सर्वच रक्कम सरकारने उभारावी, अशी अपेक्षा करण्यापेक्षा नागरिकांनीही आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वत: आणखी वैयक्तिक निधी उभारणार आहे. तसेच विविध मंगलकार्यप्रसंगी किंवा स्नेहमेळाव्यांमध्ये जाऊन नागरिकांना लष्कराविषयी, लष्करभरतीविषयी तसेच सैन्य कार्यरत असलेल्या प्रतिकूल परिस्थितीविषयी मार्गदर्शन करून त्याद्वारे निधी उभारणार आहे, असेही सुमेधा यांनी स्पष्ट केले.