अखेर तीन वर्षानंतर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

अखेर तीन वर्षानंतर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

मुंबई - गेल्या ३ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. २०१४-१५ ते २०१६-१७ या ३ वर्षातील ७७६ पैकी १९५ पुरस्काराची नावे तावडे यांनी आज जाहीर केली.

राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या क्रीडा पुरस्कारमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा खेळाडू, संघटक, कार्यकर्ते पुरस्कार, साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार आदींचा समावेश आहे. या सर्व पुरस्काराचा वितरण सोहळा १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५.३० वाजता राज्यपालांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली. या पुरस्कारात जीवन गौरव पुरस्कारासाठी बिभीषण पाटील, (२०१६-१७), डॉ. अरुण दातार (२०१५ -१६) आणि रमेश तावडे (२०१४ -१५) यांची निवड करण्यात आली आहे.

शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांच्या नियमावलीत अनेक गफलती होत्या, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पुरस्कारासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्याची संघटनांकडून तपासणी करून घेण्यात आली असल्याची माहिती तावडे यांनी दिली.