डी.एस. कुलकर्णींना तूर्तास दिलासा, बुलडाणा बँक धावले मदतीला

डी.एस. कुलकर्णींना तूर्तास दिलासा, बुलडाणा बँक धावले मदतीला

मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या मदतीला आता बुलडाणा अर्बन बँक धावून आले आहे. यामुळे डीएसकेंना तूर्तास तरी मोठा दिलासा मिळाला आहे. बुलडाणा अर्बन बँक डीएसकेंना १०० कोटींचे कर्ज देण्यास इच्छुक आहे. तसेच त्यांची विकण्यास योग्य असलेली १२ कोटींची संपत्तीही विकत घेण्यास उत्सुक असल्याचेही बँकेच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला आहे. आता २२ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय यावर आपला अंतिम फैसला सुनावणार आहे. दरम्यान मंगळवारी अखेरच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. इतके दिवस जी मागणी केली नाहीत ती आता शेवटी का करत आहात? असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला.

दरम्यान कबूल केल्याप्रमाणे आजच्या सुनावणीतही डी.एस. कुलकर्णी ५० कोटी जमा करण्यात अपयशी ठरले. मात्र उच्च न्यायालयाने यावर काही बोलायच्या आतच डी. एस. कुलकर्णींच्यावतीने बुलडाणा अर्बन बँकेचा प्रस्ताव न्यायालयापुढे ठेवण्यात आला. यावर न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, हा प्रस्ताव प्रभुणे इंटरनॅशनलच्या आश्वासनाप्रमाणे फोल ठरू नये यासाठी आमच्यासमोर ठोस पुरावे सादर करा. १७ फेब्रुवारीपर्यंत बुलडाणा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात डीएसकेंबाबतचा ठराव संमत केल्याचे पत्र तपास यंत्रणा या नात्याने पुणे ईओडब्ल्यू आणि उच्च न्यायालयाला २० फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असे निर्देश बुलडाणा अर्बन बँकेला देण्यात आले.