राज्याला भयमुक्त करा; २५० साहित्यिकांचे सीएमना पत्र

राज्याला भयमुक्त करा; २५० साहित्यिकांचे सीएमना पत्र

‘कवी दिनकर मनवर यांच्या कवितेचा चुकीचा अर्थ लावून तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग तसेच मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी हे प्रकार अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात,’ अशा शब्दांत राज्यातील सुमारे अडीचशे लेखक, कवी व पत्रकार यांनी या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. ‘कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकावण्याच्या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आहेत. आपण या प्रकारात लक्ष घालून महाराष्ट्रात भयमुक्त वातावरण निर्माण करावे,’ असे कळकळीचे आवाहन साहित्यिकांनी केले आहे. 
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेतील एका ओळीवरून काही आदिवासी संघटनांनी मनवर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. मनवर यांनी कवितेतून शोषणाचे चित्र मांडताना आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यांना विरोध होऊ लागल्याने त्यांची कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतल्यानंतर विद्यापीठावर टीका झाली. दरम्यान, मनवर यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याने लेखक व कवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. लेखक-कवी यांचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य जपावे. समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

रामदास भटकळ, निशिकांत ठकार, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, ना. धों. महानोर, अशोक बागवे, हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, हेमंत दिवटे, जयंत पवार, प्रज्ञा दया पवार, नीरजा, बाबा भांड, इग्नेशियस डायस, संजीव खांडेकर, चिन्मयी सुमित राघवन, सचिन केतकर, सलील वाघ, मन्या जोशी, दिलीप लाठी, सतीश तांबे, किशोर कदम (सौमित्र), रवींद्र लाखे, आश्लेषा महाजन, गणेश विसपुते, विजय चोरमारे, मुकुंद कुळे यांच्यासह सुमारे अडीचशे लेखक-कवी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.