खान्देशातील तरुणांना मिळणार संधी

खान्देशातील तरुणांना मिळणार संधी

येथील आयएनआयएफडी जळगाव आणि एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रा. लि. यांच्यात शैक्षणिकदृष्ट्या संयुक्त करार नुकताच मुंबई मधील कर्जत येथे करण्यात आला. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई व संचालिका संगीता प्रमोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या करून कराराचे आदान-प्रदान केले. 

देसाई यांनी ‘फर्स्ट कट’ या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट आणि मीडिया अकादमी सुरू केली. त्याच्या शुभारंभप्रसंगी हा करार करण्यात आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक निरंजन हिरानंदानी, चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, केतन मेहता, पत्रकार राजीव खांडेकर उपस्थित होते. या करारामुळे आयएनआयएफडी जळगावमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण व नंतर प्लेसमेंट मिळणार आहे. प्रशिक्षणानंतर देसाई यांच्या आगामी प्रोजेक्टस व चित्रपटांसाठी आयएनआयएफडी जळगावमधील फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना कॉस्च्युम डिझायनिंगची संधी तर इंटेरिअर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना सेटनिर्मितीपासून कलात्मक प्रोजेक्टमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी लाभणार आहे. खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी आयएनआयएफडी जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन संगीता पाटील यांनी केले आहे.