काँग्रेसने आमदारांना बंधक केले नसते, तर आमचेच असते सरकार - अमित शाह

काँग्रेसने आमदारांना बंधक केले नसते, तर आमचेच असते सरकार - अमित शाह

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच काँग्रेसने आपल्या आमदारांना बंदिस्त करून ठेवले नसते, तर कर्नाटकमध्ये आमचेच सरकार असते, असा दावा केला. पत्रकार परिषदेत बोलताना शाह म्हणाले, की येडियुरप्पा यांनी राज्यपालांकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागितली होती, असा खोटा दावा काँग्रेसने केला. जर असे असेल तर काँग्रेसकडे तसे पत्र मागायला हवे. काँग्रेस न्यायालयामध्ये देखील खोटे बोलली. काँग्रेसने आमच्यावर घोडेबाजारीचा आरोप केला, मात्र काँग्रसने तर संपूर्ण घोड्यांचा तबेलाच विकून खाल्ला. ते पुढे म्हणाले, 'भाजप कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. आमच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जनतेचा कौल पूर्णपणे काँग्रेसविरोधी आहे. मग काँग्रेस कशाचा आनंद व्यक्त करत आहे. त्यांचे अर्ध्यापेक्षा अधिक मंत्री निवडणुकीत हरले, मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनाही एका जागेवर पराभव स्विकारावा लागला. त्याचप्रमाणे जेडीएस देखील का आनंद व्यक्त करत आहे? त्यांना ३७ जागा मिळाल्या म्हणून ?' यावेळी शाह यांनी काँग्रेस आणि जेडिएसची युती जनतेच्या कौलाच्याविरोधात झाल्याचे म्हणत ही युती अपवित्र असल्याचा आरोप केला.