२०१९च्या निवडणुकीची तयारी न करता २०२४ची तयारी करा : ओमर अब्दुल्ला

२०१९च्या निवडणुकीची तयारी न करता २०२४ची तयारी करा : ओमर अब्दुल्ला

देशातील विविध राज्यांत चाललेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी आज ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आली असून भाजपच्या लाटेत विरोधी पक्षांची वाताहत झाली आहे. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ओमर अब्दुल्ला हे मोदींचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत टक्कर देणारा नेताच नसून आता विरोधी पक्षांनी २०१९ च्या निवडणुकांची तयारी न करता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागावे असेही मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर मांडले आहे.

पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निकालातून भाजपला हरवणे अवघड नाही हे स्पष्ट होते. फक्त आरोपप्रत्यारोपाचे राजकारण न करता सकारात्मक पर्याय उपलब्ध करुन दिला पाहिजे असेही ओमर अब्दुल्ला आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.  फक्त मोदींवर टीका न करता आपण कसे पुढे जाऊ ह्याचाही विचार विरोधी पक्षांनी करायला हवा असाही ते म्हणाले.
 
काँग्रेसविषयी ओमर अब्दुल्ला म्हणाले, काँग्रेसच्या दृष्टीने गोवा आणि मणिपूरमधील आघाडी दिलासा देणारी आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून आपचा उदय झाला नाही ही बाब काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरली असे अब्दुल्ला यांनी या पोस्टमध्ये नमूद केले. आपण सत्य स्वीकारुन आत्तापासून तयारी केली पाहिजे असे त्यांनी विरोधकांना आवाहन केले आहे.