ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक मुजफ्फर हुसेन यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक मुजफ्फर हुसेन यांचे निधन

मुंबई - पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक मुजफ्फर हुसेन यांचे आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रख्यात लेखक, विचारवंत अशी मुजफ्फर हुसेन यांची ओळख होती. त्यांचा जन्म २० मार्च १९४० रोजी झाला होता. त्यांना महाराष्ट्र सरकारासह, केंद्र सरकारचेही अनेक पुरस्कार मिळाले होते. २००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१४ चा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. याशिवाय राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


मुझफ्फर हुसेन यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजली आहे. त्यापैकी इस्लाम व शाकाहार, मुस्लीम मानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद : एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही पुस्तके  प्रसिद्ध आहेत.