तामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन

तामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन

तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात कावेरी पाणीवाटपावरून सुरू असलेले रेल्वे रोको आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. या आंदोलनात विरोधी पक्ष आणि शेतकरी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले आहेत. पोलिसांनी काँग्रेस नेते जी. के. वासन यांच्यासह ३०० शेतकऱ्यांना अटक केली आहे.एमडीएमके पक्षाचे मुख्य सचिव वायको आणि व्हीसीके प्रमुख थूल तिरुमावलवन यांनी कार्यकर्त्यांसोबत इगमोर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले. या वेळी एक्स्प्रेस रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. या दोन्ही नेत्यांनी रेल्वे इंजिनावर चढून केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.
त्याचप्रमाणे केंद्रीय रेल्वे स्थानकाबाहेर नाम तमिझार कात्ची नेता सीमान यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. मात्र पोलिसांनी सीमान यांना ताब्यात घेतले. तिरुचिरापल्ली आणि तंजावर जिल्ह्य़ांत लोकांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदविला. आंदोलनादरम्यान रेल्वे रोको करणाऱ्या राजकीय नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वासन यांना शंभर कार्यकर्त्यांसोबत अटक करण्याच आली.  ३०० शेतकऱ्यांनी वैगाई एक्स्प्रेस पुल्लामपाडी स्थानकावर रोखून धरली होती. या आंदोलनामुळे तामिळनाडूत सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.  आंदोलकांना रेल्वे स्थानकांमध्ये जाण्यास रोखण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथके रवाना करण्यात आली होती. कावेरीच्या पाणीवाटपावरून दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार आंदोलने सुरू आहेत. गेल्या महिन्यात कर्नाटकातील नागरिकांनी तामिळनाडूच्या बस जाळल्या होत्या.