पूरग्रस्त केरळसाठी केंद्राची ५०० कोटींची मदत

 पूरग्रस्त केरळसाठी केंद्राची ५०० कोटींची मदत

पूरग्रस्त केरळसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या १०० वर्षांतला सर्वात भयानक पूर केरळमध्ये आला आहे. आज सकाळी मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी पूरग्रस्त प्रदेशाची हवाई पाहणीदेखील केली. 

केरळमधील पूरग्रस्तांसाठी ५०० कोटी रुपयांची तत्काळ मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. गृहमंत्र्यांनी १२ ऑगस्ट रोजी १०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्याव्यतिरिक्त ही ५०० कोटी रुपयांची मदत असणार आहे. याशिवाय पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा करण्यात आली आहे. 

मोदींनी मुख्यमंत्री विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फॉन्स आणि अन्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने टि्वट करून माहिती दिली की पंतप्रधानांकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०० कोटी रुपये मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली. राज्याचे १९ हजार ५१२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी मोदींना दिली.