तिरुपती मंदिराच्या तिजोरीत सापडल्या ४ कोटींच्या जुन्या नोटा

तिरुपती मंदिराच्या तिजोरीत सापडल्या ४ कोटींच्या जुन्या नोटा

नोटाबंदीनंतर अनेक नागरिकांनी पाचशे हजारच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या किंवा बँकेत जमा केल्या परंतु काहींनी आपली हीच बेहिशेबी संपती देवाच्या दानपेटीत जमा केल्या. जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपून दोन महिने झाले असतानाही आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या बालाजी मंदिराच्या दानपेटीत ४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता सरकार ही रक्कम बेकायदेशीर घोषित करणार का? आणि आरोपींवर दंडात्मक कारवाई करणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सध्या तिरुपती बालाजी मंदिराने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या नोटांबद्दल विचारणा केली आहे. ‘मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या जुन्या नोटा बँकेत जमा केल्या जाऊ शकतात का? की जमा झालेल्या नोटांचे मूल्य शून्य असेल? या जुन्या नोटा सापडणे हे नियमांचे उल्लंघन समजेल जाणार का?’ असे प्रश्न मंदिर प्रशासनाकडून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विचारण्यात आले आहेत.

संसदेने मागील महिन्यातच निर्दिष्ट बँक नोट (उत्तरदायित्व समाप्ती) कायदा मंजूर केला आहे. या कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २७ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी केली आहे. निर्दिष्ट बँक नोट कायद्यामुळे दिलेल्या मुदतीत नोटा बदलून न घेतलेल्या लोकांवर कारवाई होऊ शकते. या कायद्यामुळे पाचशे आणि हजाराच्या १० पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. या नव्या नियमानुसार दोषींवर किमान १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासोबत जुन्या नोटांबद्दल सरकारला चुकीची माहिती देणाऱ्यांकडून किमान ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.