वाजपेयी पंचत्त्वात विलीन; मानसकन्येनं दिला मुखाग्नि

वाजपेयी पंचत्त्वात विलीन; मानसकन्येनं दिला मुखाग्नि

प्रसिद्ध कवी, प्रखर वक्ता, सशक्त पत्रकार आणि जनतेचा नेता अशी ख्याती प्राप्त झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज (शुक्रवार) पंचत्त्वात विलीन झाले. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वाजपेयी यांनी दत्तक घेतलेल्या त्यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी वाजपेयी यांच्या अंतिम क्षणांचे साक्षीदार असलेले हजारो उपस्थित लोक साश्रू नयनांनी हात जोडून उभे होते. वाजपेयी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या नात निहारिका यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवावरून तिरंगा ग्रहण केला. त्यावेळी राष्ट्रीय स्मृती स्थळावर शांतता पसरली होती. उपस्थित सर्वजण दु:खात बुडालेले होते. त्यांच्या कन्या, नात आणि कुटुंबीयांसह स्मृतिस्थळी उपस्थित प्रत्येकजणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. वाजपेयी यांचे सदैव संवेदनांनी भरलेले कविमन, त्यांच्यातील आत्मीयता, त्यांची समरसता, मधुरता आणि साधेपणा लोकांच्या स्मरणात राहील आणि याच दुर्लभ गुणांमुळे ते राजकीय वर्तुळात अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध होते. ते नेहमी मैत्रीचा हात पुढे करत गेले, त्यांना शत्रू कुणीच नव्हते. याचीच प्रचिती आज त्यांना अंतिम निरोप देताना येत होती.