सोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा

सोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा

भारताचे ‘मिसाईल मॅन’ अशी ओळख असलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज ट्विटरसह सोशल मिडीयावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. इस्त्रोतील संशोधक म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांची कारकीर्द विशेष गाजली. याशिवाय, त्यांनी २००२ ते २००७ या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपदही भुषविले. तत्पूर्वी त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) आणि संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेत (डीआरडीओ) एरोस्पेस अभियंता म्हणून काम केले. बॅलेस्टिक मिसाईल आणि लाँच व्हेईकल तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानामुळे त्यांना जगभरात भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखनही केले होते. त्यापैकी ‘विंग्ज ऑफ फायर’ हे त्यांचे आत्मचरित्र विशेष गाजले. भारत सरकारने त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले होते. २७ जुलै २०१५ रोजी वयाच्या ८३व्या वर्षी शिलाँग येथे व्यासपीठावर भाषण करताना हदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले होते.