सहिष्णुतेत कॅनडा आणि चीन भारताच्या पुढं

सहिष्णुतेत कॅनडा आणि चीन भारताच्या पुढं

आपण कितीही सदाचार आणि सहिष्णुतेच्या गप्पा मारत असलो तरी जागतिकपटलावर आपण सहिष्णुतेत अजून मागेच आहोत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून कॅनडाने पहिला नंबर पटकावला आहे. 

Ipsos MORI द्वारे सहिष्णू देशांचा सर्व्हे करण्यात आला. यावेळी जगातील २७ देशांतील एकूण २० हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. समाजात दरी निर्माण करणाऱ्या तथ्यांना प्रकाशात आणण्याचा या मुलाखतीतून प्रयत्न करण्यात आला आहे. सहिष्णू देशांच्या या यादीत कॅनडाने प्रथम स्थान पटकावलं असून चीन आणि मलेशियाने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले आहे. भारताला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. वेगवेगळे बॅकग्राऊंडस, संस्कृती आणि दृष्टिकोण असणाऱ्या ६३ टक्के लोकांनी भारत सहिष्णू असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे. 

हंगेरीचे लोक मात्र त्यांच्या देशाला कमी प्रमाणात सहिष्णू मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा नंबर लागतो. भारतात ४९ टक्के लोकांना मतभेदाचं कारण राजकारण वाटतं. राजकीय वैचारीक मतभेदामुळेच तणाव निर्माण होतं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर धार्मिक कारणामुळे मतभेद वाढत असल्याचं ४८ टक्के लोकांना वाटतं. ३७ टक्के लोकांना मात्र मतभेदाचं कारण सामाजिक आणि आर्थिक विषमतेत दिसत असल्याचं या सर्व्हेतून उघड झालं आहे.