धीरूभाई अंबानी हे पद्मविभूषण सन्मानास योग्यच होते : सुप्रीम कोर्ट

धीरूभाई अंबानी हे पद्मविभूषण सन्मानास योग्यच होते : सुप्रीम कोर्ट

रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना गेल्या वर्षी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. धीरुभाई अंबानी यांचे २००२ मध्ये निधन झाले होते. यासंदर्भात धीरुभाई अंबानी यांना देण्यात आलेला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार परत घेण्यात यावा, अशा मागणीची याचिका वकील पी. सी. श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर अंबानी हे पद्मविभूषण सन्मानास योग्यच होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

धीरुभाई अंबानी यांना देण्यात आलेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्यात यावा, अशा मागणीची याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  धीरुभाई अंबानी यांनी देशासाठी कोणतेही विशेष काम अथवा योगदान दिलेले नाही. त्यामुळे त्यांना दिला गेलेला पद्मविभूषण पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.  त्यावर सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. धीरुभाई अंबानी हे पद्मविभूषण पुरस्काराच्या सन्मानास योग्यच होते, असे खंडपीठाने म्हटले. 

त्यावेळी धीरुभाई अंबानी हे देशातील मोठे आणि यशस्वी उद्योजक होते. त्यामुळे पद्मविभूषण पुरस्कार कुणाला द्यावे हे तुम्ही ठरवू शकत नाहीत, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले. सरकारने तुम्हाला जरी पद्मविभूषण पुरस्कार दिला तरी आम्ही त्यावर प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले. भारत रत्न पुरस्कारानंतर सरकारद्वारा दिला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. धीरुभाई अंबानी यांना दिला गेलेला पद्मविभूषण पुरस्कार राष्ट्रपती भवनात दिवंगत धीरुभाई अंबानी यांच्या वतीने त्यांच्या पत्नी कोकिळाबेन अंबानी यांनी स्वीकारला होता.