लाचखोरांना नव्या नोटा हव्या

लाचखोरांना नव्या नोटा हव्या

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे लाचखोरी कमी झाल्याची अजिबात चिन्हे दिसून येत नाहीत. उलटपक्षी, नव्या नोटा किंवा अन्यथा शंभराच्या नोटा हव्यात, असा आग्रह लाचखोरांनी धरला आहे. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने खुल्या बाजारात विक्री करावयाच्या चटई क्षेत्रफळांच्या फायलीच्या मंजुऱ्या तूर्तास प्रलंबित ठेवल्या आहेत. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दर दिवशी तीन ते चार प्रकरणे दाखल होत असतात. पंतप्रधानांनी चलनबंदीची घोषणा केली त्या दिवशी राज्यात चार प्रकरणे नोंदली गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन प्रकरणे नोंदली गेली. यापैकी एका प्रकरणात सरकारी अधिकाऱ्याने फक्त शंभराच्या नोटांची लाच स्वीकारली. ११ नोव्हेंबर रोजी नव्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे सापळा रचला गेला नाही. १२ नोव्हेंबर रोजी नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारताना कोल्हापूर येथील सापळा यशस्वी झाला. १३ नोव्हेंबर रोजी तीन प्रकरणे नोंदली गेली. यापैकी पुण्याच्या प्रकरणातील निवडणूक नोंदणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने ५० हजारांची लाच शंभराच्या २०० व दोन हजारांच्या १५ नोटांच्या स्वरूपात लाच स्वीकारली. आताही या विभागाकडे अनेक प्रकरणे दाखल आहेत; परंतु सापळा रचण्यासाठी नव्या नोटांची आवश्यकता असल्यामुळे तूर्तास काही सापळे लांबणीवर टाकण्यात आले आहेत. नव्या नोटा उपलब्ध झाल्या की, लगेच सापळे रचले जातील याकडे एसीबीतील एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. जुन्या नोटा स्वीकारण्यास लाचखोरही नकार देत असल्याचे हा अधिकारी म्हणाला