काँग्रेस-राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कलह

काँग्रेस-राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कलह

मराठवाडय़ात नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ताधारी भाजपच्या तुलनेत चांगले यश मिळाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अचानक बळ आले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने थेट प्रदेश नेतृत्वाला लक्ष्य केले असताना, राष्ट्रवादीतही अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार सतीश चव्हाण यांच्यावर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची खप्पामर्जी झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील चारपैकी दोन पालिकांची नगराध्यपदे मिळाली तरी काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडय़ा सुरू झाल्या. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना लक्ष्य केले. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारल्याशिवाय काही जाहीर बोलणार नाहीत, असे मानले जाते. ते चव्हाणांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे औरंगाबादचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. खरे तर बोलताना भीडभाड न बाळगणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. एखाद्याला जाहीरपणे काही सुनावायचे असेल तर त्यांचा उपयोग केला जातो. आघाडी सरकारच्या काळात औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात असताना आमदार सत्तार यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. एका कार्यकर्त्यांला केलेल्या मारहाणीमुळे सत्तार यांचे मंत्रिपद गेले होते. कोणत्याही बैठकीत सहजपणे विषय सोडूनही ते मोठय़ांदा बोलत असतात. त्यामुळे सत्तार यांचे वक्तव्य काँग्रेस पक्षात गांभीर्याने घेतले जात नाहीत. मात्र या वेळी बाळासाहेब थोरात आणि अब्दुल सत्तार यांची भाषा थेट विखेंविरोधाची असल्याने काँग्रेसमध्ये विखेंविरोधातील मोहीम अधिक तीव्र होईल, असे मानले जाते. नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाने ‘आर्थिक’ रसद पुरविली नाही, असे सत्तार यांचे मत होते. साधा झेंडासुद्धा पक्षाने दिला नाही, असे ते सांगत होते.