केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईक कारवाईचे पुरावे मागितल्यामुळे भडकलेल्या भाजपने केजरीवाल यांचा लष्करावर विश्वास आहे की पाकिस्तानच्या प्रचारतंत्रावर असा सवाल केला आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली.
केजरीवाल यांनी जवानांचे नेतृत्व, धैर्य आणि बलिदान यांची थट्टा करू नये. पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये केजरीवाल यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळणे ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचे प्रसाद म्हणाले. केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला भारताचा दावा खोडून काढण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर केजरीवाल यांनी त्यावर मत वक्तव्य करून भारताचीच कोंडी केल्याचे प्रसाद म्हणाले.
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. प्रसाद यांनी काँग्रेस आणि आपच्या या भूमिकेबाबत तीव्र आक्षेप घेतला. राजकारण ही वेगळी गोष्ट असून लष्कराचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करू नका, असेही शंकर यांनी ठणकावले.
निरुपम यांना काँग्रेसने सुनावले
लष्कराच्या कारवाईबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचे नाव न घेता काँग्रेसने त्यांचे विधान खोडले आहे. मात्र, पाकचा खोटारडापणा खोडून काढण्यासाठी सर्व पुरावे उघड करण्याची सूचना सरकारला केली आहे.