राष्ट्रध्वजाचा वापर टाळा

 राष्ट्रध्वजाचा वापर टाळा

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी नागरिकांनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारीअश्विन मुद्गल यांनी केले आहे. 

राष्ट्रीय सण व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर नागरिक व विद्यार्थ्यांनी आणलेले प्लास्टिक तसेच कागदी राष्ट्रध्वज मैदानात किंवा रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवमानना होते. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी घातली आहे. 

रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयास सुपूर्द करावेत, असे आवाहन मुद्गल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.