आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार

आधार जोडणीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढणार

विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने ही माहिती दिली आहे. आधार कार्ड जोडणीची मुदत वाढवण्यासंबंधी शुक्रवारी केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येईल. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. आधार जोडणीची मुदत वाढवण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले. 'आधार कार्ड सक्तीचा निर्णय मागे घेऊ शकत नाही. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार आहे,' असे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले. दरम्यान, या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी ५ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात येईल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले.