म.गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांसह अनेकांची आदरांजली

म.गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांसह अनेकांची आदरांजली

देशात महात्मा गांधी यांची १४७ वी जयंती साजरी करण्यात आली, त्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर नेत्यांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर राजघाट येथे जाऊन पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गांधीजींनी या जगाला सुंदर केले. त्यांचे आदर्श, गरिबांप्रती समर्पण, अन्यायाविरोधात लढा या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पांढरा कुर्ता व पायजमा या वेशात मोदी यांनी सकाळी महात्मा गांधी यांना त्यांच्या समाधिस्थळी श्रद्धांजली अर्पण करून परिक्रमा केली, त्यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली.केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, राव इंदरजित सिंग, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया एकत्रच श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.अनेक देशांचे राजदूत व सन्मान्य व्यक्तींनी गांधी जयंतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली, अनेक शाळकरी मुले श्रद्धांजलीसाठी रांगेत उभी होती. सर्वधर्मप्रार्थना सभा यावेळी घेण्यात आली.