सीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार

सीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मंगळवारी (ता.25) होणाऱ्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल व संसदीय अधिवेशनादरम्यान तो जाहीर केला जाईल, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. सध्याचे वातावरण पाहता 2018 च्या वर्षात दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा द्यावी लागण्याची शक्‍यता आहे. ‘सीबीएसई‘च्या बोर्डाच्या परीक्षा दहावीऐवजी बारावीत घेण्याचे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) राजवटीत ठरले होते. 2010 मध्ये आलेल्या सातत्यपूर्ण व समग्र मूल्यांकन म्हणजेच 'सीसीई‘ पद्धतीच्या नावाखाली हा निर्णय घेतला गेला होता.

मात्र, संघ परिवारातून त्या वेळेसच त्याला विरोध सुरू झाला होता. या 'सीसीई‘ प्रणालीप्रमाणे दहावीऐवजी थेट बारावीतच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागत होते. देशभरातील 'सीबीएसई‘ शाळांतून याबाबत नाराजीचा सूर उमटला होता. यामुळे या अभ्यासक्रमाचा व शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याचे सांगितले जात होते. थेट बारावीची बोर्ड परीक्षा द्यावी लागत असल्याने तो दबाव पेलण्यास विद्यार्थी अपयशी ठरतात, असेही निरीक्षण अनेक शिक्षणतज्ज्ञांनी नोंदविले होते. बारावीचा टप्पा हा करिअरच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने केंद्रीय विद्यालये; तसेच सीबीएसईच्या अनेक शाळांच्या संचालकांनीही या पद्धतीबाबत आवाज उठवला होता.