स्मार्टफोनशी अती जवळीक ठरू शकते जीवघेणी

स्मार्टफोनशी अती जवळीक ठरू शकते जीवघेणी

स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक झालेला आहे. स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्सवर जास्त वेळ घालवणाऱ्यांमध्ये तणावग्रस्त होण्याची शक्यता सर्वाधिक असून अशा लोकांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्तीदेखील बळावते, असे एका संशोधनात लक्षात आले आहे.अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाचे संशोधक थॉमस जॉईनर यांनी सांगितले, 'स्क्रीनसमोर अत्याधिक वेळ घालवणे व तणावग्रस्त होणे, आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे यामध्ये परस्पर संबंध आहे.' त्यांनी सांगितले, 'मानसिक आरोग्याविषयीचे हे मुद्दे गंभीर आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.' संशोधनात आढळले, की दररोज इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्या युवकांपैकी ४८ टक्के युवकांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती आढळते. याउलट इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर एक तासापेक्षा कमी वेळ घालवणाऱ्या युवकांमध्ये या प्रवृत्तीचे प्रमाण २८ टक्के इतके आढळले. 
हे संशोधन जर्नल क्लिनीकल सायकोलॉजीकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अमेरिका सेंटर फॉर डिजीटल कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, वर्ष २०१० नंतर १३ ते १८ वर्षे वयाच्या युवकांमध्ये तणाव व आत्महत्येच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर हे यामागचे मुख्य कारण असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.