हिरड्यांच्या रोगाचे जीवाणू ठरू शकतात कॅन्सरचे कारण

हिरड्यांच्या रोगाचे जीवाणू ठरू शकतात कॅन्सरचे कारण

नियमित स्वरूपात दात स्वच्छ करणे एका मोठ्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक आहे. एका अभ्यासात आढळले आहे की, हिरड्यांच्या रोगाच्या जीवाणूंमुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सर रिसर्च पत्रिकेत प्रकाशित या संशोधनात तोंडात आढळणारे मायक्रोबायोटा (सूक्ष्मजीवांचा समूह) व अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका यांच्यामध्ये असलेल्या संबंधावर अभ्यास करण्यात आला. 
संशोधनातील संशोधक व न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या औषध विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जियान अहन यांनी सांगितले, की अन्ननलिकेचा कॅन्सर सामान्यपणे होणाऱ्या कॅन्सरमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. जगभरात कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये या कॅन्सरचे स्थान सहाव्या क्रमांकावर आहे. कॅन्सरवविषयी शोकांतिका म्हणजे, हा रोग धोक्याच्या वळणावर पोहोचत नाही तोपर्यंत रोगाचे लक्षण आढळत नाही. अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्यावर पाच वर्षे जगणाऱ्या लोकांचे प्रमाण १५ ते २५ टक्के आहे. अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये इसोफेजिअल एडनोकार्सिनोमा (इएसी) व इसोफेजिअल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (इएसीसी) या पेशी आढळतात. संशोधकांना अभ्यासात आढळले, की टॅनेरिला फोर्सिथिया नामक जीवाणू इएसी कॅन्सरचा धोका वाढवण्यास २१ टक्के जबाबदार असतात. इएससीसी कॅन्सरच्या धोक्यासाठी पोर्फाइरोमोनस जिंजिव्हलिस जीवाणू जबाबदार असतात. हे दोन्ही प्रकारचे जीवाणू सामान्यतः हिरड्यांच्या आजारात आढळतात.